पुरंदर रिपोर्टर Live
निरा: विजय लकड़े
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील महत्त्वपूर्ण निरा स्नान सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या तयारीने वेग घेतला आहे. येत्या गुरुवारी, २६ जून रोजी निरा नदीच्या दत्त घाटावर पवित्र स्नान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सातारचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यामध्ये विशेषतः ब्रिटिशकालीन जुन्या पुलाची स्थिती, संरक्षक कठडे व पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षितता यांचा समावेश होता.
याच वेळी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी दत्त घाटासह, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व स्वागत व्यवस्था यांचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत तयारी अधिक भक्कम करण्याचे निर्देश दिले.
माऊलींच्या पादुकांना नीरा स्नानासाठी घाटावर आणताना कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे एस.पी. दोशी यांनी सांगितले. पाहणीदरम्यान फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
सीईओ नागराजन यांच्या पाहणीत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, खंडाळा व फलटणचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दशक्रिया विधी घाटाचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणीही पाडेगाव व परिसरातील ग्रामस्थांनी यावेळी सीईओंकडे केली.!
यावेळी पाडेगावच्या सरपंच मंगल माने, उपसरपंच गोपीचंद धायगुडे, माजी सरपंच विजय धायगुडे, आर के धायगुडे, शंकर मर्दाने, हरिश्चंद्र माने, माजी उपसरपंच संतोष माने, रमेश धायगुडे, गणेश जाधव ,सुनील सुळ ,संतोष डोईफोडे, इत्यादी उपस्थित होते.
0 Comments